" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, December 27, 2016








भारतीय मेहनत करण्यात मागे नसतात हे वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. अथक मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर भारतीयांनी जगभरात आपला झेंडा रोवला आहे. हिमाचल प्रदेशमधील एका शेतक-याच्या मुलाने मेहनतीच्या जोरावर आज ‘हिमालय’ गाठले आहे. सरकारी शाळेत शिकलेल्या या अवलियाने आता स्वतःची विमान कंपनी सुरु केली असून हिमाचलमध्ये त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘द बेटर इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मनालीजवळ खाखनाल गावात राहणारे बुधी प्रकाश ठाकूर यांचा जन्म शेतक-याच्या घरात झाला. वडील शेतकरी आणि त्यात घरची परिस्थिती बेताचीच. बुधीप्रकाश यांचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेतच झाले. यानंतर त्यांनी चंदीगढमधील डीएव्ही शाळेतून माध्यमिक शिक्षण घेतले. तर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली. शिक्षण घेत असतानाच दुसरीकडे बुधी प्रकाश वडिलांना शेतीच्या कामात मदत करत होते. शालेय शिक्षण घेत असताना बुधीप्रकाश वडिलांसोबत सफरचंदाची लागवड करण्यासाठी मेहनत घेत होते. सफरचंदने बुधीप्रकाश यांच्या वडिलांकडे काही पैसे जमले. हिमाचलप्रदेशमध्ये पर्यटनासाठी येणा-यांचे प्रमाण जास्त असते. बुधीप्रकाश यांच्या वडीलांनी पर्यटकांच्या राहण्यासाठी पाच खोल्या बांधण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या या कामात मदत करण्यासाठी शिक्षण संपताच बुधीप्रकाश गावी परतले आणि तिथून सुरु झाला यशाचा प्रवास.

चार खोल्यांपासून सुरु झालेल्या लॉजिंगचा व्यवसाय फोफावत गेला. अवघ्या सहा वर्षात बुधीप्रकाश यांनी या व्यवसायात यश मिळवले आणि ५ खोल्यांपासून सुरु झालेला व्यवसाय ६५ खोल्यांवर येऊन थांबला. आज हिमालप्रदेशमध्ये सार्थक रिसोर्ट प्रसिद्ध असून या रिसोर्टमध्ये ६५ खोल्या आहेत.

रिसोर्ट जोमात सुरु असला तरी बुधीप्रकाश यांना व्यवसायाचा विस्तार करायचा होता आणि यासाठी आणखी मेहनत घ्यायची त्यांची तयारी होती. २०१४ मध्ये त्यांनी एअर हिमालयाज ही विमान कंपनी सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या क्षेत्राविषयी बुधीप्रकाश यांना फारशी माहिती नव्हती. पण बुधीप्रकाश यांनी धाडस दाखवले आणि चंदीगड – कुलु या मार्गावर एअर हिमालयाजचे पहिले चार्टड विमान झेपावले. चंदीगड ते कुलू रस्त्याने गेल्यास ७ तास लागतात. पण विमानामुळे हा प्रवास अवघ्या ४० मिनिटांमध्ये होतो असे ठाकूर यांनी ‘द बेटर इंडिया’ला सांगितले. ‘एअर हिमालयाज’ने गेल्या २ वर्षात अनेक चढउतार बघितले. पण ठाकूर यांनी मेहनतीच्या जोरावर कंपनीला यातून बाहेर काढले. सध्या ठाकूर यांच्याकडे नऊ आसनी छोटे विमान असून प्रति प्रवाशामागे ते सहा हजार रुपये घेतात. ठाकूर यांची हिमालयीन झेप सर्वांसाठीच आदर्शवत आहे.